दरमहा परताव्याचे आमिष दाखवून कार घेऊन तरुण फरार
पिंपरी, ता. ६ - दरमहा १८ हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून चारचाकी कार घेऊन तरुण फरार झाल्याची घटना देहू फाटा परिसरात जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. ५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल धोंडीराम सदगे (वय ४२, व्यवसाय इलेक्ट्रिशियन) हे सध्या ज्ञानेश आश्रम, दगडी बिल्डिंग समोर, देहू फाटा, आळंदी येथे वास्तव्यास आहेत. त्यांची ह्युंडाई कंपनीची पांढऱ्या रंगाची एक्सेंट चारचाकी गाडी आहे.
अंगद शिवाजी जाधव (वय ३०, रा. दत्त मंदिराजवळ, आळंदी देवाची) याने फिर्यादी सदगे यांचा विश्वास संपादन करून दरमहा १८ हजार रुपये परतावा देण्याचे सांगत ही गाडी वापरण्यासाठी घेतली. मात्र गाडी घेतल्यानंतर आरोपीने आजपर्यंत कोणतीही रक्कम दिली नाही तसेच गाडी परतही केली नाही.
या प्रकरणी आरोपी अंगद जाधव याच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत असून आरोपी अद्याप अटकेत नाही.