''माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतो'' या कारणाने तरुणावर चाकूने वार, देहूरोडमधील घटना
पिंपरी, ता. १९ - ''माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतो'' या कारणाने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने वार करुन त्याला जखमी केले. ही घटना रविवारी (ता. १७) देहूरोड पोलिस स्टेशन हद्दीतील विकासनगर-किवळे येथील सनव्ह्यू अपार्टमेंटच्या टेरेसवर रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश बाबासाहेब साठे (वय ३४ वर्षे, नोकरी, रा. सनव्ह्यू अपार्टमेंट) याने तक्रार दिली आहे. आरोपी विक्रांत काशीनाथ कुसळे (वय ३१ वर्षे, रा. सनव्ह्यू अपार्टमेंट) यास पोलिसांनी अटक केली आहे. इमारतीच्या टेरेसवर फिर्यादी निलेश यांना आरोपीने त्याच्या पत्नीशी फोनवर का बोलतो ..असे म्हणून निलेशच्या डाव्या पायाच्या मांडीवर व पोटाच्या डाव्या बाजूला चाकूने वार केले. यात निलेश गंभीर जखमी झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणी, आरोपीवर देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम २०२३ चे कलम ११८ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.