बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा द्यावी - आमदार महेश लांडगे
मोशीतील घटनेप्रकरणी आमदार लांडगे यांनी घेतली पोलिस उपायुक्तांची भेट
पिंपरी, ता. ६ - मोशी परिसरात घडलेल्या बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने शहरातील नागरीक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आमदार महेश लांडगे यांनी पिडीत बालिकेला तत्काळ न्याय मिळावा, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी केली आहे.
या मागणीसाठी आमदार लांडगे, नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी परिमंडळ - ३ चे पोलिस उपायुक्त मारुती जगताप तसेच भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक गणेश जमादार यांची भेट घेतली. तपासात कोणतीही दिरंगाई न करता आरोपीवर तातडीने आणि कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या अतिशय वाईट घटनेनंतर नागरीकांमध्ये विशेषतः लहान मुलांच्या पालकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. आरोपीला लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरु केला असून, दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
-