जमीन खरेदी व्यवहारात महिलेची ३ लाख ३८ हजारांची फसवणूक
पिंपरी, ता. ३० - जमीन खरेदी करुन देण्याचे आश्वासन देऊन एका महिलेची ३ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका ५२ वर्षीय इसमावर दिघी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ जानेवारी २०१९ ते २०२० या कालावधीत वडमुखवाडी येथील गोडाऊन चौक परिसरात घडली आहे.
या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी अझहर सिकंदर खान (वय ५२, रा. भोसरी) याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीस जमीन खरेदी करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी सुरुवातीला २० हजार रुपये टोकन म्हणून घेतले व नंतर वेळोवेळी रोख रक्कम व बँक ऑफ महाराष्ट्रच्या धनादेशाद्वारे एकूण ३ लाख ३८ हजार रुपये स्विकारले. आरोपीने स्वतःकडे जमीन विक्रीचे अधिकार असल्याचे भासवून बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केले व त्यावर फिर्यादीसह इतरांच्या सह्या त्याच्या कार्यालयात घेतल्या.
फिर्यादीचा विश्वास संपादन केला. विविध कारणे सांगत खरेदीखत करुन देण्यास टाळाटाळ केली आणि फिर्यादीची एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्यादीचे पैसे स्वतःचे फायदयाकरिता वापरुन त्याचा अपहार केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.