'सलग १८ तास अभ्यास' उपक्रमातून युवा वर्गाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन
Apr 14 2026
77
'सलग १८ तास अभ्यास' उपक्रमातून युवा वर्गाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन
पिंपरी, ता. १४ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त '१८ तास सलग अभ्यास' करुन असंख्य विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. . दापोडी येथील त्रिरत्न लॉनममध्ये सोमवारी (ता. १३) त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहायक गण संचालित स्पर्धा परीक्षा व अभ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे यंदा २१ वे वर्ष होते.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अभियानात उत्साहाने भाग घेतला. त्रिरत्न लॉनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सकाळी ६ वाजता अभ्यासाची सुरवात झाली. १८ तास विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी या अभियानाला भेट देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. अण्णा बनसोडे व काही नागरीकांनी या उपक्रमात सहभागी होत वाचन केले. या वेळी संस्थेचे संचालक अनिल जगताप, धम्मचारी विमलभद्र आणि निखिल आकाडे उपस्थित होते. तळेगाव दाभाडे येथेही हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी समोर ध्येय ठेवून त्यादृष्टीने वाटचाल करावी, विद्यार्थ्यांमधील जिद्द व चिकाटी वाढावी, या उद्देशाने गेली २० वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. दरवर्षी युवक-युवतींचा या उपक्रमाला उत्स्फूर्त मिळतो, असे संयोजकांनी सांगितले.