डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथे 'एक गाव-एक मिरवणूक
Apr 10 2026
110
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथे 'एक गाव-एक मिरवणूक
पिंपरी, ता. १० - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक महोत्सव समिती व रमाकांत तरुण मंडळाच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंती सोहळ्यानिमित्त १४ एप्रिल ते १७ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 'एक गाव, एक मिरवणूकीने तळेगाव दाभाडे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिमाखात साजरी केली जाणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या निनादामध्ये ही मिरवणूक निघेल, अशी माहिती विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सुहास गरुड, जयंत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी, महोत्सव समितीचे अध्यक्ष सुशील गरुड, विजय आगळे, मनोहर पगारे, शशिकांत गरुड, शरद गायकवाड, प्रतीक आगळे, बाबाराव अंभोरे, भागवत बिन्हाडे, बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, कुणाल आगळे आदी उपस्थित होते.
विविध कार्यक्रमांमध्ये १४ एप्रिलला सकाळी साडेनऊला रमाकांतनगर येथे धम्मपूजा होणार आहे. सायंकाळी साडेपाचला मुख्य मिरवणुकीस सुरुवात होईल. रमाकांतनगर, बाजारपेठ, जिजामाता चौक असा मिरवणूकीचा मार्ग असेल. त्यानंतर, रमाकांतनगर येथे १५ एप्रिलला सायंकाळी सात वाजता होम मिनिस्टर हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. १६ एप्रिलला सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत लहान मुलांचे नृत्य कलेचा कार्यक्रम होईल. १७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मनोरंजनपर सांगितिक कार्यक्रम आयोजित केला आहे.