तरुणाईसाठी साकारलयं.....'महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र'
तरुणाईसाठी साकारलयं.....'महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र'
महापौर रवी लांडगे यांच्या संकल्पनेतून तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा उपक्रम, भोसरीमध्ये उद्घाटन
पिंपरी, ता. १० - ''नोकरी-व्यवसायासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये येणाऱ्या तरुणाईला दिशा देण्यासाठी 'महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र' भोसरी आणि चाकण येथे सुरु करण्यात आले आहे. इथे, नोकरीच्या संधी, राहण्याबाबत मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन अशा सर्व सेवा मोफत मिळणार आहेत. 'विनामूल्य नोकरी' हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून तरुणांनी एका रुपयाचाही खर्च न करता या संधीचा लाभ घ्यावा.'', असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी तरुणाईला केले आहे.
भोसरी येथील संविधान चौका जवळ असलेल्या फुगे प्रायमा येथे असेलल्या या केंद्राचे उद्घाटन गुरुवारी (ता. ९) महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पानाही महापौरांचीच आहे. उद्घाटनप्रसंगी डॉ. संजय झोपे, संदीप पलांडे, प्रकाश लांडगे, कैलास लांडगे,प्रथमेश शेलार, आकाश कंद, प्रतीक शिंदे, ॲड प्रतीक बोराडे, संदीपक राठी, निखिल मसने, प्रशांत पवार, रुपेश खोपडे, जयश्री वाघमोडे, कांचन जगताप, कृष्णा अगरवाल, अब्दुल अहमद उपस्थित होते.

महापौर लांडगे यांनी या केंद्राची सविस्तर माहिती दिली. ज्या युवक-युवतींकडे कौशल्य आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे ते मागे पडतात, अशा शेवटच्या घटकातील मुला-मुलींना या केंद्रातून १०० % मोफत सेवा मिळणार आहे. बाहेरुन येणाऱ्या अनेक होतकरु मुलांना राहण्याची जागा शोधण्यापासून ते नोकरी मिळवण्यापर्यंत प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा एजंटकडून त्यांची फसवणूक केली जाते. हा अन्याय थांबवण्यासाठी आम्ही ही केंद्र पूर्णपणे 'विनामूल्य' सुरु केली आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या आतापर्यंत जवळपास दोन हजार युवक-युवतींनी याचा लाभ घेतला आहेत, असे महापौरांनी सांगितले.
ते म्हणाले, ''दहावी, बारावी, आयटीआय (ITI),डिप्लोमा, इंजिनिअरिंग (B.E, M.E, M.Tech) तसेच बी.ए, बी.कॉम, बी.एससी अशा सर्व शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार आहे. भोसरी येथील संविधान चौक फुगे प्रायमा, Aविंग मधील तिसरा मजला ऑफिस नंबर १२ आणि चाकण येथील कॅपिटल स्क्वेअर अशा दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त युवकांनी येथे नाव नोंदणी करुन आपल्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवावी. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांना केवळ नोकरीच नाही, तर सन्मानाचे आयुष्य देणे हे आमचे कर्तव्य आहे.''