‘दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध

‘दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध

‘दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध

यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची विशेष मुलाखत

पिंपरी, ता. १७ जुलै २०२६ - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध' या विषयावर यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांच्या अनुभवावर आधारित विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असलेली पंढरपूर आषाढी वारी ही सातशे वर्षांची अखंड परंपरा आहे. दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या भव्य सोहळ्याचे सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुरळीत व्यवस्थापन करण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून व्यापक प्रशासकीय नियोजन केले जाते. या नियोजनामागील कार्यपद्धती, अनुभव आणि प्रभावी व्यवस्थापनाची सविस्तर माहिती या मुलाखतीतून जाणून घेता येणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, १८ जुलै, सोमवार, २० जुलै, मंगळवार, २१ जुलै आणि बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन सुषमा जाधव यांनी केले आहे.

या मुलाखतीत डॉ. सुहास दिवसे यांनी पालखी मार्गाचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्षाची कार्यपद्धती तसेच महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर संबंधित विभागांतील समन्वयाची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच मोठ्या लोकसमूहाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले पूर्वनियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

वारीच्या काळात प्रशासन, स्थानिक यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि वारकरी यांच्यातील समन्वयातून श्रद्धा आणि सुयोग्य व्यवस्थापनाचा प्रभावी संगम कसा साधला जातो, तसेच सार्वजनिक प्रशासनातील उत्तम नियोजनाचे हे प्रेरणादायी उदाहरण कसे ठरते, याचा उलगडा या विशेष मुलाखतीत करण्यात आला आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories