विद्यार्थिनींना 'कमवा आणि शिका' उपक्रमांतर्गत दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन मिळणार
Apr 01 2026
99
विद्यार्थिनींना 'कमवा आणि शिका' उपक्रमांतर्गत दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन मिळणार
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
पुणे, ता. १ - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्य सरकारतर्फे राज्यभरातील विद्यार्थिनींना 'कमवा आणि शिका' या उपक्रमांतर्गत दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) येथे 'फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज' (फ्युएल) संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, 'एनएसई'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, 'फ्युएल'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे आणि 'कॅपजेमिनी'चे अनुराग प्रताप उपस्थित होते.
"राज्य सरकार, एनएसई आणि फ्युएल यांच्यातील भागीदारीमुळे राज्यातील गरजू मुलींसाठी मोफत शिक्षणाचे द्वार खुले होईल. कौशल्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे." असे पाटील म्हणाले. "यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 'फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज' संस्था आता 'राज्य कौशल्य विद्यापीठ' म्हणून सुरु होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.", असे लोढा यांनी सांगितले.
'एनएसई'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान म्हणाले, "फ्युएलने एसएसई प्लॅटफॉर्मद्वारे ९९ लाख रुपये उभे केले आहेत. या निधीपैकी ३७ टक्के वाटा किरकोळ देणगीदारांचा आहे. एनएसई प्लॅटफॉर्म आता देशातील ९९.८५ टक्के शहरांपर्यंत पोहोचला असून, याद्वारे सामान्य नागरिकांनाही सामाजिक बदलात सहभागी होण्याची मोठी संधी मिळत आहे." मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.