संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुणे मुक्कामाच्या ठिकाणाचा निर्णय १३ एप्रिलला होईल
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुणे मुक्कामाच्या ठिकाणाचा निर्णय १३ एप्रिलला होईल
पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांची माहिती, आळंदी देवस्थानची पत्रकार परिषद
पुणे, ता. १ - ''संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील मुक्कामाची जागा बदलली' ही बातमी चुकीची आहे. मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा निर्णय झालेला नाही. पालखी विठोबा मंदिरात काही गैरसोयी असल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधी, दिंडी समाज संघटनांशी चर्चा करुन सर्वानुमते १३ एप्रिलला आळंदीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल.'', असे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी मंगळवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत सांगितले.
आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आळंदीतून आठ जुलैला प्रस्थान होणार आहे. नऊ आणि दहा जुलैला पालखीचा मुक्काम पुण्यात असणार आहे. काहीठिकाणी पालखीचा पुण्यातील मुक्काम एक दिवसाचा असेल व मुक्कामाची जागा बदलली असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. म्हणून, आळंदी देवस्थानने पत्रकार परिषद घेऊन पुन्हा याबाबत माहिती दिली आहे.
अॅड. उमाप म्हणाले, "पंढरपुरात आळंदी देवस्थान, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांची बैठक हृषिकेश आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत दिंडी समाजाच्या मागणीनुसार पालखी प्रस्थान आठ जुलै रोजी दुपारी चारऐवजी तीन वाजता करण्यात येईल, असा निर्णय झाला. याशिवाय, पुण्याहून सासवड मुक्कामी पोहोचण्यास रात्री दहा वाजतात. त्यावर उपाययोजना व्हावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. भवानी पेठ पालखी विठोबा मंदिराची जागा अपुरी आहे. तेथे गर्दी वाढत आहे. त्यामुळे पालखी मुक्कामाचे ठिकाण व कालावधी हे दोन्ही निर्णय १३ एप्रिलला आळंदी जाहीर केले जातील."
पत्रकार परिषदेला आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजनाथ, चैतन्य महाराज कबीर, अॅड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, भाऊ महाराज हरपळे आदी उपस्थित होते.