अनुकरणीय - पदपथावरुन वाहन चालवणाऱ्याला प्रभावती अम्मांनी शिकवला धडा....
Feb 16 2026
42
अनुकरणीय - पदपथावरुन वाहन चालवणाऱ्याला प्रभावती अम्मांनी शिकवला धडा....
पिंपरी, ता. १६ - बेशिस्तपणे पदपथावरुन वाहने चालवणारी माणसं आपण पाहतो...आपल्यालाही त्यांचा त्रास होतो... मात्र आपण आपल्याला काय करायचं वाद घालून असं म्हणून बाजूला सरकतो...काहीच बोलत नाही आणि मग, नियम मोडण्याची वृत्ती वाढत जाते. परंतु, केरळमधील एका आज्जींनी पदपथावरुन वाहन चालवणाऱ्याचा व्हीडीओ काढून त्याला धडा शिकवला. आज्जींचा हा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या आज्जींची कृती नागरीकांना चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवलाच पाहिजे, हेच सांगणारी आहे.
केरळ येथील कोझिकोड या शहरात पदपथावरुन वाहन चालवणाऱ्याला धडा शिकवणाऱ्या आज्जींचं नाव प्रभावती आहे, त्या ७३ वर्षांच्या आहेत. त्यांच्या या धाडसी कृतीचा केरळ पोलिसांनी सन्मान केला आहे.
यावेळी, प्रभावती अम्मा म्हणाल्या की, ''नियम तोडणाऱ्या लोकांचा मला खूप दिवसांपासून त्रास होत होता. असे अनेक दादागिरी करणारे चालक पाहिल्यानंतर शेवटी मी ठरवलं की आता शांत बसायचं नाही, काहीतरी करावेच लागेल. कारण, सामाजिक क्षेत्रात काम करताना मी अनेकदा याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. पण फक्त दंड भरून अशा लोकांना सोडतात. त्यामुळे, मला हा नियम मोडण्याचा प्रकार थांबवायचाच होता. ''
प्रभावती अम्मांच्या या धाडसी कृतीचा केरळ वाहतूक पोलिसांनी सन्मान केला. सबंध देशभरात अम्मांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्याची अम्मांची कृती प्रत्येक नागरीकासाठी अनुकरणीय आहे आणि स्वयंशिस्त व नियम पाळलेच पाहिजेत हे सांगणारी आहे.
--------------------------------------------------------------------------------------------