महापालिकेच्या शहर अभियंता पदाच्या विविध विभागांच्या कार्यभाराचे तात्पुरत्या स्वरुपात वाटप
पिंपरी, ता. ५ - पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम हे महापालिका सेवेतून २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शहर अभियंता निकम यांच्याकडील विविध विभागांचा कार्यभार तात्पुरता स्वरूपात महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता मनोज सेठिया आणि सुनील भागवानी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशानुसार मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या पाणी पुरवठा व प्रकल्प विभागासह स्थापत्य विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहशहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या स्थापत्य मुख्य कार्यालय विभागासह उद्यान व क्रीडा स्थापत्य, शहरी दळणवळण या विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
सहशहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या विभागासह बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.