लोकहितवादी सेवा संघातर्फे घेण्यात आले पोलिसांसाठी नेत्र तपासणी शिबिर
पिंपरी, ता. ९ - लोकहितवादी सेवा संघ व निगडी पोलीस ठाणे यांच्या वतीने निगडी पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी नेत्र (डोळे) तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा पोलिस बंधूभगिनींनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
पोलिस प्रशासनावर मोठा मानसिक व शारीरिक असतो. त्यांचे काम नेहमी रस्त्यावर असते. बाहेरच्या प्रदूषित वातावरणात पोलिसांच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, या उद्देशाने नेत्रतपासणी उपक्रम आयोजित केला होता. या शिबिरात पोलिसांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक उपचारांबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरासाठी ईशा नेत्रालयच्या शाखा व्यवस्थापक दुर्वाक्षी पाटील तसेच वैद्यकीय संचालक डॉ. वैभव अवताडे व यशवंत बोराडे यांचे विशेष लाभले. ऑप्टोमेट्रिस्ट वैष्णवी माने व अश्विनी दाभाडे यांनी नेत्र तपासणी केली. समाजहितासाठी अशा उपक्रमांची आज अत्यंत गरज असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज बनसोडे हे शिबिराचे मुख्य संयोजक होते. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे व ईशा नेत्रालय यांनी सहकार्य केले. लोकहितवादी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव विशाल वाघमारे व अजिंक्य वाघमारे यांनीही संयोजन केले. लोकहितवादी सेवा संघाचे पदाधिकारी निलेश कांबळे, लक्ष्मण शेलार, ऋषिकेश वाघमारे, आनंद सवतमाळ आदींनीही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.