पनीरचा उल्लेख करुन प्रत्यक्षात चीज अॅनालॉग दिल्यास व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार, अन्न-औषध प्रशासनाचा इशारा
पनीरचा उल्लेख करुन प्रत्यक्षात चीज अॅनालॉग दिल्यास व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार, अन्न-औषध प्रशासनाचा इशारा
पिंपरी, ता. २७ - चीज ॲनालॉग (Cheese Analogue) हा पदार्थ दिसायला खऱ्या चीज व पनीरसारखा आहे. मात्र, हा पदार्थ दुधापासून बनवलेला नसून तो वनस्पतीजन्य तेल, स्टार्च आणि इतर रसायनांपासून बनवलेला आहे. त्यामुळे, हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील मेन्यू कार्डवर दाखवलेले पनीर खरे आहे की चीज अॅनालॉग आहे, याचा स्पष्ट उल्लेख करणे हॉटेल व्यावसायिकांना बंधनकारक आहे. मेन्यूमध्ये पनीरचा उल्लेख करुन प्रत्यक्षात चीज अॅनालॉग दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अनंत देशमुख यांनी दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड हॉटेल अॅड रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने मंगळवारी चिंचवड येथे बैठक आयोजित करण्यात आले होती. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी, अन्न निरीक्षक समृद्धी चौहान, अक्षय शेळके, असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे, सचिव तेजस जुनवणे, खजिनदार हर्षद काटे, नवीन लायगुडे, प्रसाद शेट्टी, उल्हास शेट्टी, संकेत जाधव, रमेश तापकीर, चेतन फुगे, युवराज वाघेरे, शंकर चक्रवर्ती आदींसह हॉटेल चालक उपस्थित होते.
देशमुख यांनी सांगितले की, ''मेन्यू कार्डवर दाखवलेले पनीर खरे आहे की चीज अॅनालॉग आहे याची माहिती ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. पनीर नेहमी पॅकेजिंग स्वरुपातच खरेदी करावे आणि त्यावर संबंधित डेअरीचे नाव नमूद असावे. दुग्धजन्य पदार्थांची खरेदी करताना छापील बिल घ्यावे. रेस्टॉरंटच्या बिलावर अन्न परवान्याचा क्रमांक नमूद करावा. '' या बैठकीत पीपीएल (पब्लिक परफॉर्मन्स लायसन्स) परवान्यांबाबत अधिकारी ऋषिकेश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले.