दापोडीमध्ये श्री फिरंगाई देवीचा वार्षिक उत्सव उत्साहात, असंख्य भाविकांनी घेतले देवीचे दर्शन
दापोडीमध्ये श्री फिरंगाई देवीचा वार्षिक उत्सव उत्साहात
पिंपरी, ता. १ - दापोडी येथील ग्रामदैवत श्री फिरंगाई देवीचा वार्षिक उत्सव सोमवारी (ता. ३०) व मंगळवारी (ता. ३१) उत्साहात पार पडला. असंख्य भाविकांनी देवाची दर्शन घेतले.
परंपरेनुसार सोमवारी श्री फिरंगाई देवीचे चांदीचे टाक मूळ स्थान असलेल्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे दाखल झाले. मंगळवारी हॅरिस ब्रिज येथे आलेल्या मानाच्या पालखीचे व देवीच्या टाकाचे ग्रामस्थांनी वाजत-गाजत स्वागत केले. सायंकाळी देवीचा छबीना सोहळा झाला. यावेळी फिरंगाई देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा झाली. वाद्याच्या गजरात पालखी सोहळाही झाला.
श्री फिरंगाई देवी उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषभ काटे, उपाध्यक्ष मंगेश नवघणे व मयूर मोरे, उत्सव प्रमुख शिवाजी काटे, खजिनदार पंकज काटे आणि सचिव ओंकार काटे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संयोजन केले.
आज, बुधवारी (दि. १) सायंकाळी कुस्ती स्पर्धा रंगणार असून राज्यभरातील पैलवान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान हर्षवर्धन सदगीर याची विशेष उपस्थिती असणार आहे.