'फिरोदिया करंडक' आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
Mar 13 2026
48
'फिरोदिया करंडक' आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
पुणे, ता. १३ - सोशियो इकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट, फिरोदिया करंडक आणि एचसीएल फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित 'फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा - २०२६'चा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी (ता. ११) अण्णा भाऊ साठे सभागृहात उत्साहात पार पडला.
यावेळी अभिनेते सुबोध भावे, अभिनेते प्रवीण तरडे, गायक महेश काळे, महापौर मंजूषा नागपुरे, फिरोदिया कुटुंबाच्या प्रतिनिधी जया फिरोदिया, अभिनेते सुबोध भावे, प्रवीण तरडे आणि गायक महेश काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 'एचसीएल फाउंडेशन'चे नितीन देशपांडे तसेच स्पर्धेचे संस्थापक आयोजक सूर्यकांत कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तृतीय क्रमांक विजेत्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने 'अख्तरी' या नाटकाचे सादरीकरण केले. त्यानंतर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या द्वितीय क्रमांक विजेत्या संघाने 'रॅपटा' प्रयोग सादर केला. करंडक विजेत्या एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या संघाने 'सिनेमा केसरी' हे नाटक सादर केले. महापौर मंजूषा नागपुरे यांनी पुण्याची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम करण्यासाठी या मंचावर घडलेल्या मान्यवरांनी महापालिकेला सहकार्य व मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.
यावेळी सुव्रत जोशी आणि जयदीप वैद्य यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कायनेटिक उद्योग समूहाच्या वतीने 'लिजेंडरी परफॉर्मन्स ऑफ दी इयर' या विशेष नामांकनाखाली यंदापासून इलेक्ट्रिकल वाहन देण्याची घोषणा जया फिरोदिया यांनी केली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सानिया मुंगारे हिला हे विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले. यानंतर, विविध वैयक्तिक, सांघिक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले. सावनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमाचे मुख्य संयोजक अजिंक्य कुलकर्णी होते.