महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी रविवारी पोलिस बंदोबस्तात होणार
पुणे, ता. १३ - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी रविवारी (ता. १५) परिषदेच्या वास्तूमध्ये पोलिस बंदोबस्तात पार पडणार आहे. सकाळी ८:३० वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत निकाल लागणार आहे. परिषदेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या तीन पदांसह पुणे जिल्हा व शहर कार्यवाह पदासाठी ही निवडणूक होत आहे. उद्या (दि. १३) टपालाने मतपत्रिका पाठविण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांच्या समक्ष मतपेट्या सील केल्या जाणार आहेत.
साहित्य परिषदेची निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. त्यांनतर २०२१ मध्ये झालेल्या परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीने मुदतवाढ घेतल्याने विद्यमान कार्यकारिणीकडे दहा वर्षे परिषदेच्या कारभाराची सूत्रे होती. आता पाच वर्षांनी निवडणूक होत आहे. उत्कर्ष परिवर्तन आणि साहित्य संवर्धन अशा दोन आघाड्यांमध्ये स्पर्धा आहे. राज्यभरात परिषदेचे १६ हजारांहून अधिक सदस्य आहेत.
निवडणूक मंडळाकडून मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. मतमोजणीच्या वेळेस कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी निवडणूक मंडळाने पोलिस बंदोबस्त मिळावा अशा मागणीचा अर्ज पोलिस आयुक्तालयात केला असल्याचे निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी सांगितले.
मतमोजणीची नियमावली अशी -
- मतमोजणीला स्वतः उमेदवार व त्यासोबत फक्त एक प्रतिनिधी उपस्थित राहू शकेल.
- मतमोजणीच्या वेळेस उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीने मोबाइल किंवा कॅमेरा आणू नये.
- मतमोजणीच्या वेळेस कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण किंवा संपर्क करु दिला जाणार नाही.
- मतमोजणी सुरु झाल्यापासून संपेपर्यंत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला मतमोजणी स्थळ सोडता येणार नाही.
- मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीने कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा हुज्जत घातल्यास अशा उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना स्थळ सोडावे लागेल.
- निवडणूक मंडळाचा निर्णय अंतिम असेल.