अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेत नियमोल्लंघन करणाऱ्या ६ आस्थापनांचे परवाने निलंबित
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेत नियमोल्लंघन करणाऱ्या ६ आस्थापनांचे परवाने निलंबित
पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - अन्न व औषध प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल, बेकरी, रेस्टॉरंटच्या केलेल्या तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. या शिवाय कोंढवा बुद्रुक परिसरात विनापरवाना वाहतूक केला जाणारा ५९८ किलो मीठा मावा जप्त केला असून, त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. ही विशेष मोहिम १ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार पाडली.
या मोहिमेत हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी तसेच विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या दरम्यान काही आस्थापनांमध्ये अस्वच्छता, मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवून ठेवणे, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन आढळून आले. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असलेल्या या प्रकारांची गंभीर दखल घेत आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातही कारवाई केली असून, तेथील हॉटेलांवर कारवाई केली आहे.
कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्समध्ये द लोटस रिसॉर्ट, मोरवे (लोणावळा), द मसल फूड्स (बेकरी) (बिबवेवाडी), हुमा बेकरी, (गणेशनगर, पिंपरी-चिंचवड),
न्यू महाराष्ट्र बेकर्स (दत्तनगर रस्ता, आंबेगाव बुद्रुक), मारकेश व्हेंचर्स (पर्वती, सहकारनगर), स्विन्स्टा ईएनटी (वारजे जकात नाका, कर्वेनगर) यांचा समावेश आहे.