news
clock

शहरात महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत मुलींसाठी मोफत 'एचपीव्ही' लसीकरण मोहिम सुरु

पिंपरी, ता. १० -  "आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 'एचपीव्ही' लसीकरण मोहीम सुरु आहे. त्या अंतर्गत महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत १४ वर्षे पूर्ण आणि १५ वर्षांखालील मुलींसाठी मोफत लस दिली जाणार आहे. पुढील तीन महिने ही मोहीम सुरु राहील," अशी माहिती महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली. 'एचपीव्ही' लस सुरक्षित, प्रमाणित आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी असल्याने पालकांनी मुलींचे लसीकरण वेळेत करुन घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारीपासून 'एचपीव्ही' लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत वैद्यकीय विभागाने सांगवी रुग्णालयात मोहिमेचा प्रारंभ केला. त्यात २४ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, तालेरा रुग्णालय चिंचवड, नवीन भोसरी रुग्णालय, इंदिरा गांधी प्रसूतिगृह सांगवी रुग्णालय सांगवी, नवीन थेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय पिंपरी, हभप प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय येथे लस उपब्ध आहे.

लस घेण्यासाठी संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून मोफत 'एचपीव्ही' लस मिळेल. लस घ्यायला येताना आधार, शाळेचे (आय कार्ड) किंवा तत्सम ओळखपत्र घेऊन आणि भरपेट नाश्ता करून पालकांनी मुलींना घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लसीकरण करुन घेणे आवश्यक.....

'एचपीव्ही' व्हायरस हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा मुख्य कारणीभूत घटक आहे. योग्य वयात म्हणजे १५ वर्षापूर्वी दिलेली ही लस मुलींना दीर्घकालीन संरक्षण देते. त्यामुळे पालकांनी १४ वर्षाच्या मुलींचे लसीकरण वेळेत करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories