news
clock

 शहरात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा

पिंपरी, ता. १० - विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान, रोजगार मेळावा, आरोग्यविषयक मार्गदर्शन, फॅशन शो, महिलांच्या क्रिकेट स्पर्धा.....यासह विविध सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमांनी शहरात सर्वत्र जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

- पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने विविध क्षेत्रात कौतुकास्पद काम करणाऱ्या महिलांना गौरवण्यात आले. पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल नीता भावसार, संगीता घोडके, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. डॉ. अनुराधा ठाकरे, महापालिकेतील उपअभियंता सुरेखा कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सायन्स पार्कचे संचालक प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमा दरम्यान सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा खंपरिया यांनी सन्मानार्थींच्या मुलाखती घेतल्या. सायन्स पार्कच्या  संचालक प्रवीण तुपे यांनी मनोगत व्यक्त करताना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विज्ञान क्षेत्रात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित केल्याचे सांगितले.

- विकासनगर-किवळे येथील भारतरत्न सोसायटीतील श्री दत्त मंदिरात महिला मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी महिलांसाठी विविध खेळ घेऊन विजेत्यांना पारितोषिके व पैठणी साड्या वाटप करण्यात आले. यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. महिलांना बचत व आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 'लकी ड्रॉ' काढून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे भेट देण्यात आली. यावेळी रवींद्र कदम, राजाभाऊ महाले, विजय पवार, वैशाली वाकचौरे, प्रदीप भिजगे उपस्थित होते.

- स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अॅकॅडमीच्या पुनावळे आणि वाकड शाखांच्या वतीने दोन दिवसीय पुनेविला प्रीमियर लिग ३ या महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या 'रॉयल शेरनीज' या विजेत्या संघाला रविवारी (ता. ८) करंडक प्रदान करुन गौरवण्यात आले. पुनेविला प्रीमियर लिग -  ३ या स्पर्धेत झाँसी फायटर्स, दुर्गा वॉरियर्स, रॉयल शेरनीज, मराठा स्ट्राईकर्स या संघांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा समारोप गायक अथर्व कुलकर्णी यांनी सांगीतिक मैफलीने केला. त्यामध्ये कृतिका शिरसाठ, कल्पा फडते, आरती धांडे, मीनल चव्हाण, चैतन्य शरण, भाग्यदा कुलकर्णी, योगेंद्र लांजे यांनी गायनसाथ केली. श्रद्धा कांबळे आणि उमा शाह यांनी संयोजन केले.

- कासारवाडी परिसरातील महिलांनी छत्रपती शिवरायांची महाआरती करुन महिला दिन साजरा केला. सकल हिंदू समाज कासारवाडी यांच्या वतीने आयोजित हिंदू संमेलन गारजाई देवी चौकाजवळ उत्सहात संपन्न झाले. पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी मीनल शुक्ल, सामाजिक कार्यकर्ते तथा लेखक नरेंद्र पेंडसे, धनंजय चंद्राद्रे, जयवंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन ज्ञानराज तटीकुंडलवार यांनी केले.

- वाल्हेकरवाडी येथील श्री संत नामदेव शिंपी समाज मंदिरात नामाई महिला मंडळाच्या वतीने (ता. ८) जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. डॉ. प्रीती ढगे यांनी गरोदरपणात घ्यावयाची काळजी याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. डॉ. मोहिनी बेंद्रे यांनी कर्करोग व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांविषयी माहिती दिली. विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेवर आधारित फॅशन-शो वेगळेपण ठरले. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये डॉ. प्रीती ढगे, उज्वला काकडे, भारती चव्हाण, धनश्री गनबोटे आणि शुभदा पाटुकले यांनी सादरीकरण केले. यावेळी भावस्पर्शी नाटिका सादर करण्यात आली.  मंडळाच्या अध्यक्षा संगीता खर्डे यांनी संयोजन केले. श्रद्धा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories