हातभट्टीच्या विषारी दारुमुळे झालेल्या १३ जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपी योगेश वानखेडे याला अटक
हातभट्टीच्या विषारी दारुमुळे झालेल्या १३ जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपी योगेश वानखेडे याला अटक
पिंपरी, ता. २९ - पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांत एकापाठोपाठ एक ८ जणांचे मृत्यू झाले आणि पुण्यातही ५ जणांचा मृ्त्यू झाला आहे. हातभट्टीची विषारी दारु प्यायल्याने हे मृत्यू झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणात आरोपी योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली असून त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपीने विक्री केलेली दारुची कॅन पोलिसांनी जप्त केली आहेत. योगेश वानखेडेसह आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. वानखेडे पुण्यातील मुंढवा परिसरात रहिवासी होता. पुण्यातील उरुळी कांचन आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथे हा वानखेडे बनावट दारु बनवायचा. ही बनावट दारु तो पुण्यातील हडपसर, काळेपडळ आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात विकायचा.
आरोपीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी व्हिसेरा (Viscera) राखून ठेवला आहे, शवविच्छेदन अहवालातून नेमकी माहिती समोर येणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पोटदुखी आणि मळमळ यांसारखी समान लक्षणे आढळल्यानंतर या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. फुगेवाडीतील मृत्यूंबाबत पोलिसांनी विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे म्हटले होते. प्रत्येक प्रकरणात वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. तरीही पोलिस प्राथमिक माहिती नोंदवून या घटनांची सखोल चौकशी करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. याच दरम्यान, पुण्यातही पाच जणांचे मृत्यू झाल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरु केला.
फुगेवाडी व पुण्यातील मृतांची नावे - पांडुरंग फुगे (वय ५७), विजय राठोड (वय ३१), राजेंद्र राठोड (वय ३४), राजेंद्र राजपूत (वय ५३), अकबर पठाण (वय ५२), बाबा शेख, आनंद निकाळजे, आनंद देसाई, राहुल शरद क्षीरसागर (वय 45), विजय भूकुरलाल शर्मा (वय 45), अरुण डाडर, अशोक रमेश चव्हाण यांच्यासह अन्य एक व्यक्ती.