कासारवाडी येथे गॅस सिलिंडरचा साठा जप्त
पिंपरी, ता. १४ - अन्न-धान्य पुरवठा विभागाने कासारवाडी परिसरातून दोन टेम्पोमधून 57 भरलेले आणि 207 रिकामे भारत गॅसचे सिलेंडर शुक्रवारी (ता. १४) जप्त केले आहेत. अन्न-धान्य पुरवठा विभागाच्या पथकाने संशयाच्या आधारे कासारवाडी येथे छापा टाकला.
तपासणीमध्ये दोन टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर आढळून आले. तसेच टेम्पोच्या बाजूला गॅसचे सीलही सापडल्यामुळे या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅसमध्ये बेकायदेशीर रिफिलिंग केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जप्त केलेले सिलेंडर आणि टेम्पो ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास अन्न-धान्य पुरवठा विभागाकडून सुरु आहे. संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे अन्न-धान्य पुरवठा विभागाचे परिमंडळ अधिकारी विजय कुमार क्षीरसागर यांनी सांगितले.