news
clock

 रावेत येथे पवना नदीवर नवीन बंधारा बांधण्यासाठी १०५ कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे 

आमदार शंकर जगताप यांची माहिती 

पिंपरी, ता. १४ - आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे हस्तांतरण आणि रावेत येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे आधुनिकीकरण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा सुरु आहे. शहराला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मावळ तालुक्यातील मौजे शिरे येथील 0.95 हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडून कायमस्वरुपी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे आणि रावेत येथे पवना नदीवर नवीन बंधारा बांधण्यासाठी १०५ कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार शंकर जगताप यांनी याबाबत मागणी केली आहे. महायुती सरकार त्याबाबत सकारात्मक असल्याचे जगताप यांनी सांगितले.  आमदार शंकर जगताप म्हणाले, ''शहराला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मावळ तालुक्यातील मौजे शिरे येथील 0.95 हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडून कायमस्वरुपी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी जॅकवेल, अप्रोच चॅनेल, पंप हाऊस आणि सबस्टेशन उभारले जाणार आहे. मुख्य अभियंत्यांनी (जलसंपदा) सदर प्रस्ताव महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पाठवला असून, या जमिनीचे मूल्यांकन व हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे आंद्रा धरणाचे पाणी थेट शहरात पोहोचवण्यातील तांत्रिक अडथळे दूर होणार आहेत.''


''शहराला पाणीपुरवठा करणारा रावेत येथील पवना नदीवरील बंधारा ब्रिटिशकालीन असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊन दररोज सुमारे ५ कोटी लिटर पाणी वाया जाते. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून जुन्या पद्धतीचा बंधारा बदलून तिथे व्हर्टिकल लिफ्ट शाफ्ट (उभी उचल पद्धत) हा तांत्रिकदृष्ट्या प्रगत बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधुनिक बंधाऱ्यामुळे गाळ साचण्याची समस्या दूर होईल आणि पाण्याचा अपव्यय थांबेल. या प्रकल्पासाठी १०५ कोटी रुपयांचा सविस्तर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.'' असे जगताप यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याचे नियोजन मार्गी लावण्यास प्राधान्य

''पिंपरी-चिंचवडकरांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये. यासाठी आंद्रा धरण प्रकल्प आणि रावेतचा नवीन बंधारा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दोन्ही कामांना गती मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु असून, पाणी टंचाईवर तोडगा काढून पाणीपुरवठ्याचे नियोजन मार्गी लावणे हे आमचे प्राधान्य आहे.''

- शंकर जगताप, आमदार, पिंपरी-चिंचवड शहर




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories