संत विचारांची परंपरा जोपासण्यासाठी घुमान अभ्यासदौरा मार्गदर्शक ठरेल - महापौर रवी लांडगे

 घुमान अभ्यास दौऱ्यातील संतपीठाच्या सदस्यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान

पिंपरी, ता. १६ - ''संतांच्या विचारांतून प्रेरणा घेत समाजात ऐक्य, बंधुता आणि सद्भावना अधिक दृढ होत आहे. संत विचारांची ही अमूल्य परंपरा जपणे, तिची जोपासना करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी संतपीठाच्या माध्यमातून घुमान येथील अभ्यास दौरा मार्गदर्शक ठरेल.'', असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. 

पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वास्तव्य केलेल्या घुमान-पंजाब येथे नुकताच  ५ दिवसीय अभ्यास दौरा पार पडला. या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी १८ सदस्यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते महापालिकेत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त तथा संतपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप खोत, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी तथा संतपीठाच्या सचिव संगीता बांगर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, संतपीठच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक हभप राजु महाराज ढोरे, संतपीठाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, चिंतन समिती सदस्य ज्ञानेश्वर भांगरे, संगीत शिक्षक महेश शेळके, अविनाश भोगील, चंद्रकांत गोसावी,विलास कोकाटे , मराठी शिक्षिका मंगल अंबरे, विज्ञान शिक्षक अर्चना देसाई, सुचेता पुजारी, कला शिक्षिका मुग्धा शिरोडकर, पूर्णिमा इंगळे, कार्यालयीन सहाय्यक अनिकेत चासकर व अखिल नवनाथ पोखरकर उपस्थित होते. 

महापौर लांडगे म्हणाले, ''शीख संप्रदायाचा धर्मग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत परंपरेतील अनेक संतांच्या वाणीसह संत नामदेव यांच्या अभंगांचा समावेश आहे, ही बाब महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नाते घट्ट करणारी आहे. भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा हा सांस्कृतिक वारसा दोन्ही राज्यांना एका सूत्रात बांधतो आणि राष्ट्रीय एकात्मतेचे सुंदर उदाहरण ठरतो. ''

असा होता अभ्यासदौरा....

अभ्यास दौऱ्यात घुमान इंटरनॅशनल पब्लिक स्कुल, बाबा नामदेवजी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज, बाबा आया सिंग रिअरकी कॉलेज या ठिकाणी भेटी दिल्या. घुमान येथील संत नामदेव महाराज मंदिरामध्ये संतपीठाचे संचालक हभप राजू महाराज ढोरे यांचे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या "तु अगाध वैकुंठनायका | तेरे चरणो मेरा माथा ||" या अभंगावर किर्तन संपन्न झाले. या अभंगाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सांप्रदायचे दृष्टांत देत अभंगाच्या प्रत्येक चरणाचा अर्थ स्पष्ट केला. संत शिरोमणी नामदेवरायांच्या मंदिरात महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक परंपरेनुसार प्रथमच हिंदी किर्तन सेवा पार पडली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance