पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील शासनाच्या मालकीच्या १७४ जागा 'पीएमआरडीए'ला मिळणार
पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील शासनाच्या मालकीच्या १७४ जागा 'पीएमआरडीए'ला मिळणार
पुणे, ता. १६ - विविध नागरी प्रकल्पांसाठी शासनाच्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील १ हजार ८७८ हेक्टर जमिनी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) विनामूल्य दिल्या जाणार आहे. याबाबतचा आदेश गतवर्षी राज्य शासनाने दिला होता. त्यानुसार 'पीएमआरडीए'ला या जमिनी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये राज्य शासनाच्या मालकीच्या अनेक जमिनी तशाच पडून आहेत. या जमिनींवर सातत्याने लक्ष ठेवणे प्रशासनासाठी अवघड आहे. यापैकी काही जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. इतरही जागांवर अतिक्रमणे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या मालकीच्या या पडीक जमिनी पुण्यासह राज्यातील चारही प्राधिकरणांना पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांसाठी विनामूल्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
त्यानुसार पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यातील सुमारे १ हजार ८७८ हेक्टर शासनाच्या मालकीच्या सुमारे १७४ जागा प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या जागांची यादी तयार करण्यात आली आहे आणि या जागा प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासन स्तरावरुन सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे, नवनवीन नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी 'पीएमआरडीए'ला मोठे व्यासपीठ मिळाले आहे.
आकडेवारी -
हवेली तालुका -२६ जागा - क्षेत्र ३७२.७७ हेक्टर
मावळ तालुका - ४५ जागा - क्षेत्र ३३१.७७ हेक्टर
मुळशी तालुका - १७ जागा - क्षेत्र ९५.९१ हेक्टर
दौंड तालुका - ४ जागा - क्षेत्र ८.४९ हेक्टर
शिरुर तालुका - २० जागा - क्षेत्र १११.७ हेक्टर
पुरंदर तालुका- ७ जागा - क्षत्र २२१.७६ हेक्टर
भोर तालुका - १० जागा - क्षेत्र २२.३० हेक्टर
खेड तालुका - ४५ जागा - क्षेत्र ७१४.०६ हेक्टर
एकूण - १७४ जागा - १ हजार ८७८.७६ हेक्टर