news
clock
राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, काही जिल्हे उच्च जोखीम श्रेणीमध्ये ...........  'कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोन्मेंट अँड वॉटर' संस्थेचा निष्कर्ष

राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, काही जिल्हे उच्च जोखीम श्रेणीमध्ये ........... 'कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोन्मेंट अँड वॉटर' संस्थेचा निष्कर्ष

राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, काही जिल्हे उच्च जोखीम श्रेणीमध्ये

 'कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोन्मेंट अँड वॉटर' संस्थेचा निष्कर्ष 

पुणे, ता. १६ - राज्यातील तापमानाचा पारा अधिकच चढला असल्याने उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वर्धा यांसह आणखी काही जिल्ह्यांना  हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. 'कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोन्मेंट अँड वॉटर' या संस्थेकडून काही जिल्ह्यांचा अति-उच्च उष्णता धोका श्रेणीत तर काही जिल्ह्यांचा उच्च जोखीम श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात गुरुवार (ता. १६) ते शनिवारपर्यंत (ता. १८) कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

 हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी (ता. १६) विदर्भातील अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील ४८ तासांत दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे.

 मध्य महाराष्ट्रात लोहगाव, जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा आणि सोलापूर येथे तसेच  मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.  पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गुरुवारी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. 

कर्नाटक आणि महाराष्ट्रालगतच्या समुद्रसपाटीवर वातावरणाच्या मधल्या थरात निर्माण झालेल्या प्रति चक्रीय स्थितीमुळे (अॅन्टी सायक्लॉन) उष्णतेची तीव्रता वाढत आहे. उत्तर कर्नाटकावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे, अशी माहिती हवामान  विभागाने दिली आहे. 

पुण्यातील बुधवारचे  (ता. १५) तापमान अंश सेल्सिअसमध्ये  -

शिवाजीनगरमध्ये -  ३९.२, कोरेगाव पार्क - ३९.३, मगरपट्टा - ३९.६, हडपसर - ३८.५, वडगाव शेरी - ३८.८, चिंचवडमध्ये - ३८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. 


पुढील अंदाज - 

- विदर्भ - बुधवार (ता. १५) ते रविवारपर्यंत (ता. १९) उष्णतेच्या लाटेची स्थिती

- मध्य महाराष्ट्र - बुधवार (ता. १५) ते शनिवारपर्यंत (ता. १८) उष्णतेची लाट

- मराठवाडा -  गुरुवार (ता. १६) ते शनिवार (ता. १८) दरम्यान उष्णतेची लाट





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories