दुर्गाटेकडीवर १ हजार झाडांची लागवड करुन 'हरित पिंपरी-चिंचवड शहर' अभियानाचा प्रारंभ
पिंपरी, ता. ५ - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकसहभागातून 'हरित पिंपरी-चिंचवड शहर' अभियानाचा प्रारंभ शुक्रवारी (ता. ५) सकाळी ७ वाजता दुर्गादेवी टेकडी येथे झाला. शहरातील असंख्य नागरीकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी, 'पीसीएमसी न्यूज'चे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप लिखित 'दुर्गाटेकडीचा ५० वर्षांचा इतिहास' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
अभियानाच्या प्रारंभी १ हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन ही केवळ एका दिवसाची मोहिम नसून भावी पिढ्यांसाठीची आपली सामूहिक जबाबदारी आहे, या भावनेतून संपूर्ण वर्षभरात ५ लाख वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. झाडे फक्त लावायची नाहीत, तर त्यांचे संगोपनही उत्तमरित्या करायचे आहे, हे या अभियानाचे उद्दीष्ट आहे.
या प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, नगरसेवक अमित गावडे, कुशाग्र कदम, शैलजा मोरे, निलेश निवाळे,अरुणा लंगोटे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उद्यान विभाग मुख्य उद्यान अधिक्षक महेश बाळकृष्ण गारगोटे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.