कर्जाचे आश्वासन देऊन ५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक
पिंपरी, ता. ६ - व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका इसमाने एका बांधकाम व्यावसायिकाची ५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ५ ते २७ जानेवारी २०२६ दरम्यान हिंजवडी गावात घडली आहे. आरोपीवर सोमवारी (ता. ६) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, फसवणूक झालेले बांधकाम व्यावसायिक अनिकेत संजीव कुमार अग्रवाल (वय ३५ वर्षे, रा. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी दिपक कोंडीबा फडके (रा. कानगाव, ता. दौंड) याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१६ (२), ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कोंडीबा फडके याने फिर्यादी अग्रवाल यांना बांधकाम व्यवसायाकरीता ४ कोटी रुपये कर्ज मिळवून देतो असा बहाणा करुन त्यांचा विश्वास मिळवला. तारण ठेवण्याकरीता बाणेर येथील फ्लॅटचा सामंजस्य करारनामा केला. कराराची मूळ प्रत व कर्जाच्या रक्कमेकरीता आगाऊ सुरक्षा ठेव म्हणून ५ लाख ५० हजार रुपये घेतले. नंतर, ही रक्कम परत दिली नाही.