वायसीएम रुग्णालयाच्या  निष्काळजीपणामुळे  झालेल्या रावसाहेब  खंडागळे यांच्या मृत्यूबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी - मानव कांबळे

वायसीएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या रावसाहेब खंडागळे यांच्या मृत्यूबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी - मानव कांबळे

वायसीएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या रावसाहेब  खंडागळे यांच्या मृत्यूबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी - मानव कांबळे 

पिंपरी, ता. ८ -  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण  रुग्णालयामध्ये शुक्रवारी (ता. ५) रुग्णालयाच्या गैरवस्थापनामुळे व निष्काळजीपणामुळे महापालिकेचे निवृत्त कर्मचारी रावसाहेब वामन खंडागळे यांचा मत्यू झाला आहे. त्यामुळे या गैरव्यवस्थेला जे जबाबदार कर्मचारी आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, खंडागळे यांच्या कुटुंबास योग्य ती आर्थिक मदत द्यावी आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना त्वरीत रुग्णालाच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. याबाबत, समितीने आयुक्तांना निवेदन दिले आहे. 

या निवेदनात सांगितले आहे की,  दिवंगत रावसाहेब वामन खंडागळे यांचा शुक्रवारी (ता. ५) दुपारी साडेबारा ते पाऊण या दरम्यान फुगेवाडी ते दापोडी दरम्यान पुणे मुंबई महामार्गावर अपघात झाला.  ते स्वतः दुचाकीवरून येत असताना मागून येणाऱ्या एका कारने त्यांना जोरात धडक दिली. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांना 'वायसीएम'मध्ये उपचारासाठी आणले असता रुग्णालयामध्ये 'बॅटरी चार्ज नाही' असे कारण सांगून खंडागळे यांचा एक्स-रे काढण्यास अर्ध्या तासापेक्षा अधिक विलंब लावण्यात आला, रुग्णाबरोबरच्या व्यक्तींनी अनेकदा विनंती करुनही तेथील महिला कर्मचारी त्यांच्याशी उद्धटपणे बोलत होत्या व त्यांना सहकार्य करत नव्हत्या हे अतिशय गंभीर आहे. 

बॅटरी आल्यानंतर एक्स-रे काढला आणि त्यानंतर सोनोग्राफी करण्याची गरज असते तिथेही या रुग्णाच्या पुढे आणखी दोन-तीन रुग्ण असल्यामुळे त्यांच्या सोनोग्राफीला उशीर झाला खरंतर इमर्जन्सी म्हणून तातडीची गरज पाहता या रुग्णाला प्राथमिकतेने सोनोग्राफीसाठी घेणे आवश्यक होते परंतु, घटनेचे कुठलेही गांभिर्य कधीही नसलेले 'वायसीएम'चे कर्मचारी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वागले. दरम्यानच्या काळात रुग्णाच्या शरीरामध्ये कदाचित अंतर्गत रक्तस्त्राव  झाल्यामुळे त्यांची परिस्थिती गंभीर झाली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले व काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने जाहीर केले. हा सर्व प्रकार पाहता यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये किती बेजबाबदारपणे  कामकाज चालते याची प्रचिती येते. 

ज्या रुग्णालयामध्ये प्रतिदिन हजारापेक्षा अधिक रुग्ण येऊन उपचार घेत असतात त्या रुग्णालयामध्ये अशा प्रसंगी एकच एक्स-रे मशीन असते एकच सोनोग्राफी मशीन असते हे व्यवस्थापकीय दृष्ट्या अतिशय चुकीचे असून, तो एक प्रकारे गुन्हा आहे असे आम्ही समजतो. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आठ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेले अंदाजपत्रक जर वैद्यकीय उपकरणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देऊ शकत नसेल तर मग वायसीएम सारख्या हॉस्पिटलमध्ये  शेकडो डॉक्टर्स, कर्मचारी आणि इतर लोक काम करतात त्यांना फक्त वेतन देण्यासाठी हे हॉस्पिटल चालविले जाते का? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडल्याशिवाय राहत नाही.


 या संदर्भात 'वायसीएम'चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याशी संवाद केल्यानंतर त्यांनी "या केस मध्ये रुग्णाचा एक्स-रे वेळेवर काढला होता, परंतु सोनोग्राफीला पुढे अगोदरचे लोक असल्यामुळे उशीर झाला, आणि त्यामुळे पेशंटला जी दुखापत होती ती गंभीर झाली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले" असे त्यांनी स्वतःहून सांगितले. त्यामुळे या गैरव्यवस्थेला जे जबाबदार कर्मचारी आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, खंडागळे यांच्या कुटुंबास योग्य ती आर्थिक मदत द्यावी आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना त्वरीत रुग्णालाच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना द्याव्यात. 

समितीच्या महत्त्वाच्या मागण्या - 

१) खंडागळे यांच्या मृत्यूला जे जबाबदार कर्मचारी आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. 

२) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

३)  आवश्यक असतील तेवढ्या पुरेशा प्रमाणामध्ये एक्स-रे मशीन किंवा सोनोग्राफी मशीन्स वायसीएममध्ये व महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories