बावधनमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; पतीविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार
बावधन | 3 सप्टेंबर 2026 : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीशी भांडण करून तिच्या गळ्यावर धारदार वस्तूने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना बावधन परिसरात घडली. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून, मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून बावधन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 2 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 ते 3 सप्टेंबर रोजी पहाटे 5:00 या कालावधीत भूगाव रस्त्यावरील तोडकर वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी सुरेश परशुराम हरिजन (वय 24,) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून परशुराम भागप्पा हरिजन (वय 48) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे आई-वडील हे त्यांच्या भाड्याच्या खोलीत झोपले होते. आरोपी परशुराम याला पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय होता. याच संशयावरून त्याने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर परशुराम याने कोणत्यातरी हत्याराने अथवा धारदार वस्तूने पत्नीच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हल्ल्यासाठी नेमकी कोणती वस्तू वापरण्यात आली, घटना कोणत्या परिस्थितीत घडली आणि आरोपी सध्या कुठे आहे, याचा तपास सुरू आहे.
याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 401/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत आरोपीचा शोध घेतला जात आहे.