जिवंत काडतुसांसह पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १३ - रुपये १ लाख २ हजार किंमतीची देशी बनावटीची दोन पिस्तूल दोन जिवंत काडतुसांसह बाळगणाऱ्या तीन तरुणांना संत तुकारामनगर पोलिसांनी रविवारी (ता. १२) पिंपरी येथील एच. ए. मैदानातून ताब्यात घेतले. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक भास्कर बर्फे (वय २६ वर्षे रा. रामनगर, पिंपळे गुरव), अतुल बबन भालेराव (वय ३१ वर्षे, रा. दापोडी) व मुकेश राम काची (वय २६ वर्षे रा. दापोडी) हे तिघे पिस्तूल बाळगणारे आरोपी आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई केली होती. या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन आरोपींनी विनापरवाना पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगले होते. एकूण १ लाख २,०००/- रुपये किंमतीची पिस्तूले व जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. तसेच १ लाख रुपये किंमतीची मोटारसायकलही या तरुणांकडून पोलिसांनी ताब्यात घेतली.
आरोपींविरोधात संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम ३ (५), भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.