'जाहिरात फलकद्वारे शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार'
क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या आयुक्तांनी दिल्या सूचना, शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
पिंपरी, ता. ७ - आपल्या शहराची स्वच्छता व सौंदर्य जपणे ही प्रशासन व नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी नागरिक आणि जाहिरातदारांनी नियमांचे पालन करुन महापालिकेला सहकार्य करावे. अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स आणि भिंतींवरील जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्याबाबतच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरित्या लावण्यात येणारे जाहिरात फलक, बॅनर्स, फ्लेक्स तसेच दूरध्वनी खांब, महावितरण डीपी आणि सार्वजनिक भिंतींवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. हे रोखण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि बीट निरीक्षक यांच्या मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करुन अनधिकृत फलक, बॅनर्स, फ्लेक्स त्वरित हटवावेत. अशा जाहिरातींवर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित जाहिरातदारांना नोटिसा बजवाव्यात, अशा सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.
याशिवाय, कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स अथवा भिंतींवरील जाहिराती लावणे हा नियमबाह्य प्रकार असून संबंधितांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व इतर लागू कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याबाबत कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही. आवश्यकतेनुसार फलक तत्काळ हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक....
''नागरिक आणि जाहिरातदारांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे. महापालिका प्रशासन शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि शिस्तबद्ध जाहिरात व्यवस्थेसाठी कटिबद्ध असून सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.''
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका