विनापरवाना ५२ हजार रुपयांचे पिस्तूल बाळगणाऱ्या २३ वर्षीय युवकाला अटक
Apr 11 2026
84
विनापरवाना ५२ हजार रुपयांचे पिस्तूल बाळगणाऱ्या २३ वर्षीय युवकाला अटक
पुणे, ता. ११ - मनाई आदेशांचा भंग करुन विनापरवाना ५२ हजार रुपयांचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या २३ वर्षीय युवकाला बावधन पोलिसांनी सूस परिसरातून अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (ता. ९) करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई रवी पवार (गुन्हे शाखा, युनिट - २, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. अदित्य लक्ष्मण शितोळे (वय २३, रा. लाईफ मॉन्टेज सोसायटी, सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या आदेशानुसार शस्त्रे, चाकू, कोयता, तलवारी, बंदुका आदी बाळगण्यास बंदी असताना आरोपीने बेकायदेशीररित्या पिस्तूल जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. हे पिस्तूल आरोपीचा मित्र आदेश उर्फ ऋषिकेश राम टेमकर याने ठेवण्यासाठी दिल्याचे आरोपीने सांगितले. आरोपीजवळचे सुमारे ५२ हजार रुपये किंमतीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.
आरोपीविरोधात बावधन पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.