चाकणमध्ये देशी पिस्तूल व जिवंत काडतूसासह २९ वर्षीय युवक अटकेत
पिंपरी, ता. १६ - चाकण परिसरात विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला चाकण उत्तर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी चक्रेश्वर रोडवरील सह्याद्री कॉलेजसमोरील ओढ्याजवळ करण्यात आली.
गौरव मच्छिंद्र डोगरे (वय २९, रा. विघ्नेश पार्क, चक्रेश्वर रोड, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुमीत गौतम जगझाप यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा सुमारे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने कोणताही परवाना नसताना हे शस्त्र बेकायदेशीररीत्या जवळ बाळगले होते. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने लागू केलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.