वाकडमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण, तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल
Mar 31 2026
36
वाकडमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण, तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ३१ - जुन्या भांडणाचा राग धरुन तिघांनी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. ३०) वाकड येथील इंदिरा कॉलेज युनिटी कॅम्पसमध्ये घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमकार मंगेश पाटील (वय २१, रा. चिंचवड) याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओमकार हा सोमवारी (ता. ३०) सायंकाळी सुमारे ५ वाजता हिंदीचा पेपर देऊन महाविद्यालयातून बाहेर येत होता. त्यावेळी आरोपी प्रथमेश नडे (वय २१), अदिनाथ ढमाले (वय २२) आणि ओमकार कोल्हे (वय २२, सर्व रा. काळेवाडी, पुणे) यांनी त्यांना अडवले.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी “तू आमच्याकडे खुन्नसने का पाहतोस?” असा जाब विचारत फिर्यादी ओमकारला मारहाण केली. आरोपी प्रथमेश नडे याने हाताने मारहाण केली असता त्याच्या हातातील अंगठी फिर्यादीच्या नाकाला लागली. आरोपी अदिनाथ ढमाले याने जवळील लोखंडी खुर्चीनेही हल्ला केला. आरोपींनी धमकी देत शिवीगाळही केली.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भा.न.सं. कलम ११८(१), ३५२, ३२४(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.