मावळ तालुक्यात गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, ता. ३१ - मावळ तालुक्यातील उर्से परिसरात पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (ता. ३०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास उर्से ते बारीवणा रोडलगत एका पानटपरीच्या मागील बाजूस करण्यात आली. ६ हजार रुपयांच्या गांजासह एकूण ११,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. ३०) रात्री ९.५१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सचिन बबनराव काचोळे यांनी फिर्याद नोंदवली,
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश मुळक (वय ३६, रा. विशालनगर, उर्से, ता. मावळ) असे आहे. आरोपीकडून सुमारे ६,०००/- रुपयांच्या किमतीचा गांजा (कॅनाबियस वनस्पतीची पाने, फुले, बिया व बोंडे) तसेच ५,०००/- रुपयांचा ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण ११,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८ (क) व २० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.