पिंपरी-चिंचवड | १८ ऑक्टोबर २०२६ : बौद्ध धम्मातील प्रज्ञा, करुणा, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या मूल्यांचा जागर करत चिंचवड येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत स्त्रीशक्ती, महिला नेतृत्व, जागतिक भिक्खुनी परंपरा, ऐतिहासिक योगदान आणि मानसिक स्वास्थ्य अशा विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. परिषदेला सुमारे एक हजार उपासक-उपासिकांची उपस्थिती होती.
विस्डम इन मोशन, कॅटलिस्ट फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १७) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. उज्ज्वला अंदुरकर, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. वैशाली भामरे आणि लक्ष्मीकांता माने यांनी परिषदेच्या आयोजनात पुढाकार घेतला.
परिषदेची सुरुवात बुद्ध अँथमवरील नृत्य सादरीकरण आणि व्हिएतनामी बौद्ध परंपरेतील मंत्रोच्चाराने झाली. देश-विदेशांतील बौद्ध भिक्खुनी, अभ्यासक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी परिषदेत सहभाग घेतला.
प्रमुख पाहुण्या प्रा. विमल थोरात यांनी बुद्ध आणि आंबेडकरी विचार पुढे नेण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांनी बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची आणि महाराष्ट्रात स्वतंत्र पाली विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली.
प्रा. मनोरी पी. सेनानायके यांनी बौद्ध मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्वावर मार्गदर्शन केले. भिक्खुनी महाकासा, भिक्खुनी विसुद्धिपन्ना, डॉ. रुपाली भामरे मून आणि डॉ. योजना भगत यांनी जागतिक भिक्खुनी परंपरा, आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि बौद्ध महिलांच्या ऐतिहासिक योगदानावर विचार मांडले.
मानसिक स्वास्थ्यावरील सत्रात डॉ. नीलम ओसवाल यांनी ताण, चिंता आणि मानसिक अस्वस्थतेवर मात करण्यासाठी धम्माच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी आंबेडकरवादी विचार स्वीकारण्याचा आपला प्रवास सांगितला.
‘जयभीम २.०’ या चर्चासत्रात छाया कविरे, मीनाक्षी इंगळे आणि डॉ. सांची कांबळे यांनी नव्या पिढीचा आंबेडकरी विचारांशी असलेला संबंध उलगडला. मार्गदर्शित ध्यानाच्या सत्राने परिषदेची सांगता झाली.
या परिषदेत मीराताई आंबेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ॲड. रंजना भोसले, वैशाली शेलार आणि डॉ. मनीषा कर्णे यांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.