पिंपरी-चिंचवड | १९ ऑक्टोबर २०२६ : फ्लॅटच्या नावावरून झालेल्या वादात बांधकाम व्यावसायिकाला शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना महाळुंगे परिसरात घडली आहे. या मारहाणीत व्यावसायिक जखमी झाले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास बाजीराव पाडाळे चौकाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत घडली.
या प्रकरणी विष्णू शिवाजी कोरेवाड (वय ४४ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. ते बांधकाम व्यवसाय करतात.
फिर्यादीनुसार, लक्ष्मण दामोदर नवघरे आणि राजाभाऊ दामोदर नवघरे यांनी फिर्यादीला फ्लॅटबाबत चर्चा करण्यासाठी बाजीराव पाडाळे चौकाजवळील मोकळ्या जागेत बोलावले होते.
त्यावेळी लक्ष्मण नवघरे यांनी फ्लॅट नावावर करून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राजाभाऊ नवघरे यांनीही फिर्यादीला हाताने मारहाण केल्याचे नमूद आहे.
दरम्यान, फिर्यादीचा मुलगा विशाल हा भांडण सोडविण्यासाठी आला असता लक्ष्मण नवघरे यांनी त्यालाही बांबूने मारहाण करून जखमी केले. तसेच ‘तुम्हाला मी सोडणार नाही, तुम्हाला जीवे मारतो’, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बावधन पोलीस करत आहेत.