तळेगाव दाभाडे | १९ ऑक्टोबर २०२६ : इंजिनिअरिंग कॉलेजमधून घरी जात असलेल्या विद्यार्थ्याला कारचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून चार अनोळखी तरुणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना तळेगाव दाभाडे परिसरात घडली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नूतन इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी श्रेयस बजरंग पवार (वय २२ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे.
श्रेयस पवार हे नूतन इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. घटनेच्या वेळी ते कॉलेजमधून कारने घरी जात होते. त्यांच्या कारच्या पुढे रस्त्यावर काही काही मुले घोळका करून उभी होती.
यावेळी फिर्यादीने आपल्या कारचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याचा इशारा दिला. मात्र, त्याच वेळी दोन तरुण फिर्यादीच्या कारजवळ आले. त्यांनी ‘आम्ही गाववाले आहोत, तू आम्हाला हॉर्न देतो का?’ असे म्हणत वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर फिर्यादी कारच्या बाहेर उतरले असता आणखी दोन तरुण तेथे आले. या चौघांनी मिळून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एका तरुणाने जड वस्तू मारल्यामुळे फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी चार अनोळखी तरुणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.