गुंतवणूकीच्या आमिषाने ८४ लाख ७४ हजार रुपयांचा अपहार
पिंपरी, ता. १७ - गुंतवणूकीच्या आमिषाला बळी पडल्याने एका ४३ वर्षीय इसमाची ८४ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार १४ फेब्रवारी २०२४ ते २३ जुलै २०२४ दरम्यान मावळ तालुक्यातील ब्लॅक लायन ट्रांसलिंक्स प्रा.लि. येथे घडला आहे. या प्रकरणी आरोपींवर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन श्रीकांत चव्हाण (वय ४३, व्यवसाय : मॅन्युफॅक्चरिंग, रा. कंबाला हिल रोड, मुंबई) यांना आरोपी सुजित ठाकूर यांनी उच्च परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवले. कंपनीत मोठी गुंतवणूक करण्याचे आश्वासन देत विश्वास संपादन करण्यात आला. दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ ते २३ जुलै २०२४ या कालावधीत तसेच पुढील टप्प्यात आरोपींनी फिर्यादीकडून विविध बँक खात्यांमध्ये रुपये १५,१४,०००/-, रुपये ४४,१०,०००/- आणि रुपये २५,५०,०००/- असे एकूण रुपये ८४,७४,०००/- रुपये घेतले. आरोपी शैलेश पटेल (रा. गुजरात) आणि सुजित ठाकूर (रा. विरार पश्चिम) यांनी ''कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक करणार'', असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणतीही गुंतवणूक न करता अथवा रक्कम परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी आरोपींविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १६) भारतीय न्याय संहितेच्या ३१८(४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.