news
clock

शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने ११.१३ कोटींची फसवणूक, राजस्थान-महाराष्ट्रातून ७ जणांना अटक

पिंपरी, ता. ६ - शेअर बाजारातील आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तक्रारदाराची तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र व राजस्थानमधून सात आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १ कोटी ८० लाख रुपये होल्ड (ब्लॉक) करण्यात आले आहेत.

सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३३८, ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ मधील कलम ६६(सी) व ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक - तक्रारदाराला शेअर आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगून आरोपींनी वारंवार वेगवेगळी कारणे देत त्यांच्याकडून एकूण ११,१३,००,००० रुपये घेतले. मात्र कोणताही परतावा न दिल्याने तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तांत्रिक तपासातून आरोपींपर्यंत पोहोच - तपासादरम्यान आरोपींनी अॅक्सिस बँकेच्या खात्यात २१ लाख रुपये घेतल्याचे समोर आले. हे खाते ‘गंगासाई टेक्सटाईल’ या नावाने कोल्हापूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या पथकाने कोल्हापूरमध्ये तपास करून अभय बाबासाहेब पाटील याला अटक केली.

चौकशीत त्याने हे खाते शिवतेज राजेंद्र पोटे (वाघोली, पुणे) याला दिल्याचे कबूल केले. त्यानंतर पोटे याला अटक करण्यात आली. पुढील चौकशीत त्याने १५ ते २० बँक खाती सायबर गुन्ह्यासाठी वापरल्याची कबुली दिली.

पुणे व राजस्थानमधून अटक - पुढील तपासात युवराज उर्फ संतोष मुदलीयार (पुणे), पंकज मंगु गिरीगोस्वामी उर्फ रॉनी (राजस्थान) आणि प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (राजस्थान) यांचा सहभाग समोर आला. पोलिसांनी स्वतंत्र पथके पाठवून त्यांना अटक केली.

मुंबईतून आणखी दोन जणांना अटक - या गुन्ह्यात कोटक बँकेच्या खात्यात २५ लाख रुपये जमा झाल्याचे आढळले. हे खाते ARS Enterprises नावाने महेश करबसपा उडचणे (दहिसर, मुंबई) याच्या नावावर असल्याचे समोर आले. चौकशीत त्याने हे खाते राहुल बहादुरप्रसाद मौर्य (दहिसर, मुंबई) याला कमिशनवर दिल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांनाही अटक करण्यात आली.

अटक आरोपी -

१) अभय बाबासाहेब पाटील (कोल्हापूर)

२) शिवतेज राजेंद्र पोटे (वाघोली, पुणे)

३) महेश करबसपा उडचणे (दहिसर, मुंबई)

४) राहुल बहादुरप्रसाद मौर्य (दहिसर, मुंबई)

५) युवराज उर्फ संतोष सतीश मुदलीयार (लोहगाव, पुणे)

६) पंकज मंगु गिरीगोस्वामी उर्फ रॉनी (राजस्थान)

७) प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (राजस्थान)

सदरची कारवाई  पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड विनय कुमार चौबे, डॉ. शशिकांत महावरकर (सह पोलीस आयुक्त),  सारंग आव्हाड (अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), डॉ. शिवाजी पवार (पोलीस उप आयुक्त गुन्हे) डॉ. विशाल हिरे (सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१) यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोउपनि वैभव पाटील, पोउपनि सागर पोमण, पोउपनि रोहीत डोळस, पोउपनि प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार, दिपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुभाष पाटील, सुरज शिंदे, किरण देवकर, श्रिकांत कबुले, सौरभ घाटे, प्रविण शेळंकदे, अतुल लोखंडे,. सोपान बोधवड, माधव आरोटे, नितेश बिचेवार, दिपक माने, दिपाली चव्हाण, स्वप्निल खणसे सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे. आरोपी विरोधात न्यायालयीन कामकाजाच्या वेळी सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी न्यायालयात बाजु मांडुन आरोपींची पोलीस कोठडी रिमांड मिळवुन देण्यास मदत केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories