जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने प्रबुद्ध साठे यांना जेतवन 'धम्म भूषण पुरस्कार' प्रदान, इतरही समाजषण पुरस्कारांचे वितरण
जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने प्रबुद्ध साठे यांना जेतवन 'धम्म भूषण पुरस्कार' प्रदान, इतरही समाजषण पुरस्कारांचे वितरण
पिंपरी, ता. ११ - वाकड येथील जेतवन विहार येथे झालेल्या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्करांनी गौरवण्यात आले. जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये, महाराष्ट्र,कर्नाटक, तेलंगणा या राज्यात प्रभावीपणे बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार करणारे प्रबुद्ध साठे यांना 'जेतवन धम्म भूषण पुरस्कार - २०२६' प्रदान करण्यात आला. शिवव्याख्याते व ज्येष्ठ पत्रकार अनिल वडघुले यांना 'समाजभूषण पुरस्कार', क्रिकेट पंच समालोचक दत्ता सुर्यवंशी यांना 'निर्भिड पत्रकारिता', संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतिश काळे यांना सामाजिक पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी नगरसेवक नेहा कलाटे,आरती चोंधे, विनायक गायकवाड, कुणाल वाव्हळकर , शालिनी गुजर आदींनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. यावेळी अनिल वडघुले यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ''हल्लीच्या पिढीने महापुरुषांच्या विचारांचा प्रभावीपणे प्रसार करायला हवा. समता, सद्भावना,आचार-विचार याचा बारकाईने अभ्यास करुन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे विचार अंगिकारले पाहिजेत. तेव्हाच समाजपरिवर्तन घडेल.''
नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी जेतवन ट्रस्टच्या उपक्रमांचे कौतुक केले. येथील मैदानावर भव्यदिव्य अशी सर्व सोयींनी सुसज्ज असे पार्किंग, खेळाचे मैदान व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रबुद्ध साठे यांचा 'चलो बुध्द की और' प्रबोधन गितांचा कार्यक्रम सादर झाला, या कार्यक्रमासाठी नागरीकांची मोठी उपस्थिती होती.
जेतवन ट्रस्टचे अध्यक्ष बी. जी. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. निलेश खोब्रागडे यांनी सूत्रसंचालन केले. जेतवन उत्सव समिती अध्यक्ष विजय खरात यांनी आभार मानले. श्याम सोनवणे, आनंद जाधव, दिपक कांबळे, तुषार भिंगे, संजय वाघमारे, अरविंद गायकवाड, अनिल साळवी, संतोष जाधव,राज घनघाव, सचिन गाडे, हरिभाऊ राऊत, सचिन साळवी यांनी संयोजन केले.