सराफी दुकानात ५० हजार रुपयांची तीन पैंजणे चोरण्याचा प्रयत्न, तीन महिलांना अटक
पिंपरी, ता. २१ - खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात तीन महिलांनी ५० हजार रुपयांची तीन पैंजणे चोरण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. २०) शिवाजी चौक-चिखली येथील बालाजी ज्वेलर्समध्ये घडली. चोरी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत, सुनिल जवाहरलाल पवार (वय ३२ वर्षे, नोकरी, रा. चिंचवड) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी महिला निलाबाई बाबू शिंदे (वय ५५ वर्षे), फुलाबाई भानुदास ढोकळे (वय ६० वर्षे) व इंदाबाई दिलीप ढोकळे (वय ६० वर्षे) यांना अटक केली आहे. या तिघी जालना जिल्ह्यातील आहेत. या महिला बालाजी ज्वेलर्समध्ये अंदाजे ५०,००० रुपये चांदीची तीन पैजणे (वजन १८० ग्रॅम) चोरण्याचा प्रयत्न केला.
आरोपी महिलांवर चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ),६२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.