पुणे महापालिका आयोजित 'कलावारी' चित्रकला स्पर्धेत तब्बल ४ लाख विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे महापालिका आयोजित 'कलावारी' चित्रकला स्पर्धेत तब्बल ४ लाख विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे, ता. ४ जुलै २०२६ - पुणे महानगरपालिकेच्या ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’उपक्रमांतर्गत आयोजित ‘कलावारी’ चित्रकला स्पर्धेत पुण्यातील तब्बल ४ लाख विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भक्ती, संस्कृती, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणीवेचे प्रभावी दर्शन घडविले. चित्रे रेखाटण्यात सर्व विद्यार्थी मग्न झाले होते. ही स्पर्धा पुण्यातील सर्व मनपा आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या कल्पकतेचे, कलागुणांचे आणि सामाजिक भानाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून विठ्ठल-रखुमाई, पालखी सोहळा, दिंडी, संतपरंपरा तसेच ‘सेवावारी’चा संदेश अत्यंत प्रभावीपणे साकारला.
'' 'कलावारी' हा केवळ चित्रकला स्पर्धेचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, स्वच्छतेची जाणीव, पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभिमान जागविणारी प्रेरणादायी चळवळ आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने शहरातील विविध शाळांना भेट देत चिमुकल्या कलाकारांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या कलागुणांचे, सृजनशील विचारांचे आणि सामाजिक विषयांबाबतच्या संवेदनशील दृष्टिकोनाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि कलाप्रेम अनुभवण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विठ्ठल-रखुमाई, पालखी सोहळा, दिंडी, संतपरंपरा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सेवावारीचा संदेश अप्रतिम चित्रांमधून साकारला. प्रत्येक कलाकृतीत भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर दर्शन घडले.'' असे महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या.
