सोसायट्यांनी आपला एसटीपी प्रकल्प योग्य देखभाल करुन नियमितपणे सुरु ठेवावा, पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेचे आवाहन

सोसायट्यांनी आपला एसटीपी प्रकल्प योग्य देखभाल करुन नियमितपणे सुरु ठेवावा, पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेचे आवाहन

एसटीपी उभारणे बिल्डरची जबाबदारी आणि नियमित देखभाल करणे सोसायटयांची जबाबदारी 

सोसायट्यांनी आपला एसटीपी प्रकल्प योग्य देखभाल करुन नियमितपणे सुरु ठेवावा, पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेचे आवाहन 

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - बांधकाम व्यावसायिकाने कार्यरत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारून दिल्यानंतर तो नियमितपणे सुरू ठेवणे, त्याची योग्य देखभाल करणे आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे ही जबाबदारी गृहरचना संस्थांनी (सोसायट्यांनी) जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने सर्व सोसायट्यांना केले आहे.  

याबाबत संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पर्यावरण संरक्षण ही महापालिका किंवा बिल्डर्सचीच जबाबदारी आहे आणि प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीचीही तेवढीच सामाजिक जबाबदारी आहे. कार्यरत करुन दिलेल्या एसटीपी प्रकल्पाची योग्य देखभाल न करणे हे पर्यावरणाप्रती निष्काळजीपणाचे लक्षण आहे. सर्व सोसायट्यांनी पर्यावरणाच्या हितासाठी एसटीपी प्रकल्प नियमितपणे कार्यरत ठेवावा. पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्य आहे.

 पात्र गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पूर्णपणे कार्यरत एसटीपी उभारणे, त्याची चाचणी घेणे आणि कार्यान्वित करूनच सोसायटीचा ताबा देणे ही बिल्डरची कायदेशीर जबाबदारी आहे. कार्यरत एसटीपीशिवाय कोणतेही महापालिकेने पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate) किंवा भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) देऊ नये, असे संघटनेने म्हटले आहे. पर्यावरण संरक्षण, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि बिल्डर्सची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. 

संघटनेचे अध्यक्ष सत्यव्रत त्रिपाठी म्हणाले, “संघटनेची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे.  नदीची पूजा करायची आणि त्याच नदीत अशुद्ध सांडपाणी सोडायचे, ही दुटप्पी भूमिका आम्हाला मान्य नाही. बिल्डरांनी कार्यक्षम एसटीपी उभारल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पाला महापिा पूर्णत्व किंवा भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये. पर्यावरण संरक्षण ही केवळ कायदेशीर नव्हे तर नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरणाच्या हितासाठी घेतलेल्या प्रत्येक योग्य निर्णयाला संघटना पूर्ण पाठिंबा देईल, तर पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही कृती किंवा भूमिकेला ठाम विरोध करेल.”

संघटनेचे सचिव प्रकाश जुंकटवार म्हणाले, “पर्यावरण संरक्षणाची सुरुवात सांडपाण्याच्या योग्य व्यवस्थापनापासून होते. प्रक्रिया न केलेले सांडपाणी नद्या आणि जलस्रोतांसाठी गंभीर धोका आहे. कार्यक्षम एसटीपी ही केवळ कायदेशीर अट नसून भविष्यातील पिढ्यांप्रती आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक बिल्डरने सोसायटीचा ताबा देण्यापूर्वी कार्यरत एसटीपी उभारणे बंधनकारक केले पाहिजे.”


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories