कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती
पुणे, ता 28 - कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी आतापर्यंत १०० मिळकती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी गेल्या दोन महिन्यांपासून या कामाला गती दिली आहे.
रुंदीकरणाचे हे काम साडेतीन किलोमीटर रस्त्याचे आहे. आधी ८४ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, रुंदीकरणासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्यामुळे संबंधित काम रखडले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ८४ मीटरऐवजी ५० मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केले.
रस्ता रुंदीकरणासाठी या एप्रिलपासून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानुसार, भूसंपादनासाठी महापालिकेने आतापर्यंत १०९ पैकी १०० मिळकती ताब्यात घेतल्या आहेत. उर्वरित नऊ मिळकतीही लवकरच ताब्यात घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
८४ मीटर रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी त्यासाठी आवश्यक जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. त्यासाठी सक्तीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.