केतन अग्रवाल हत्या प्रकरण अपडेट्स -
सिया व चेतनने चार महिन्यांपूर्वीच गुपचूप केले होते लग्न, पोलिसांची माहिती
पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकले होते, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटची तपासणी केली असता, त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्या चौकशीमध्ये त्यांच्या मोबाइलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या तपासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. सहा ते सात महिन्यांतील डिजिटल माहितीची पोलिसांकडून सखोल पडताळणी सुरू आहे. तपासादरम्यान सिया आणि चेतन यांनी चार महिन्यांपूर्वीच कुटुंबीयांपासून लपवून लग्न केले होते, असे तपासात समोर आले आहे.
हा विवाह केतन आणि सिया यांच्या १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या साखरपुड्याच्या आसपासच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हे लग्न साखरपुड्याच्या आधी झाले की नंतर झाले, हे स्पष्ट झालेले नाही.
सिया व चेतन या दोघांनी केतनच्या खूनासाठी अनेक वेब सिरीज तसेच पॉडकास्ट आणि देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती घेतल्याचेही समोर आले आहे. आरोपींच्या मोबाईलमधील सहा ते सात महिन्यांपासूनच्या चॅटिंगची सखोल पडताळणी केली आहे.