पालखी सोहळ्यानिमित्त 'पीएमपीएमएल'कडून जादा बसेसचे नियोजन
पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून दरवर्षीप्रमाणे यंदाही नियोजन करण्यात आलेले आहे.
भाविक नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक ५ जुलै २०२६ पासून दिनांक ९ जुलै २०२६ पर्यंत आळंदीला जाण्यासाठी स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकूण १७९ बसेस मार्गावर राहणार आहेत. श्री क्षेत्र आळंदी करिता दिनांक ८ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
याशिवाय दिनांक ५ जुलै २०२६ पासून दिनांक ९ जुलै २०२६ पर्यंत देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून नियमितपणे संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकूण ३१ बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा १५ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दिनांक ९ जुलै २०२६ रोजी आळंदी येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत असल्यामुळे पहाटे २:३० वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाण्यासाठी जादा १८ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी ५:३० वाजल्यापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील १५० बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान ४० आवश्यक) देण्यात येईल.
तसेच पुण्याहून दोन्ही पालख्यांच्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक ११ जून २०२६ रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२:०० ते ०१:०० दरम्यान थांबणार असल्याने त्या वेळेत महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तदनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरुळी कांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक सुरू ठेवण्यात येईल.
हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पूर्णतः बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बस वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. या जादा गाड्यांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.