भोंदू खरात प्रकरण - अपडेट
खरातकडे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी चार वेगवेगळे मोबाईल नंबर
पुणे, ता. ३१ - भोंदू खरातची विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरु आहे. खरात वेगवेगळ्या लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी चार वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत होता, अशी माहिती चौकशीमध्ये समोर आल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.
सूत्रांनी माहिती दिली आहे की, अशोक खरातचा एक मोबाईल नंबर हा केवळ अतिमहत्त्वाच्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरला जात होता. या नंबरवरुन काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी त्याचा संवाद होत होता का याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. दुसरा मोबाईल नंबर हा काही विशेष भक्त आणि महिलांशी संपर्कासाठी वापरला जात होता व या नंबरवरुन झालेल्या संभाषणांचा तपासही सध्या सुरु आहे.
तिसरा मोबाईल नंबर हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांसाठी वापरला जात होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. देणग्या, पैशांचे व्यवहार किंवा इतर आर्थिक देवाणघेवाणी संदर्भातील माहिती या नंबरमधून मिळण्याची शक्यता असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे. चौथा मोबाईल नंबर हा सर्वसामान्य लोकांशी संपर्कासाठी वापरला जात असल्याचे समोर आले आहे.
फॉरेन्सिक टीमकडून या सर्व मोबाईल नंबरचा आणि मोबाईल फोनचा डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरु आहे. डिलीट केलेले कॉल रेकॉर्ड, मेसेजेस आणि इतर डिजिटल पुरावे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तपास यंत्रणा आता खरातच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहितीही गोळा करत आहेत. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.