कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी, किवळे पुलावर अपघात
पिंपरी, ता. ७ - मागून येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात देहूरोडकडून तळवडेकडे जाताना किवळे पुलावर घडला. आरोपी कारचालकावर सोमवारी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, वेदांत यशवंत भुजबळ (वय २७ वर्षे, नोकरी, रा. कोथरुड) याने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अथर्व गणेश तापडीया (रा. सदाशिव पेठ) असे आरोपीचे नाव आहे.
वेदांत हा आपल्या मोटारसायकलवरुन देहूरोडकडून तळवडेकडे जात होता. किवळे पुलावर मागून येणाऱ्या सोनेट या कारने वेदांतच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे वेदांत खाली पडला. त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्या खाली तसेच उजव्या पायाच्या घोट्याखाली गंभीर दुखापत झाली. कारचालक अथर्व हा अतिशय वेगाने निष्काळजीपणे गाडी चालवत होता. त्यामुळे वेदांत जखमी झाला. आरोपीवर
भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१,१२५ (अ), १२५ (ब), ३२४ (२) मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.